पुणे: शहरात कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. तसेच थंडीचे प्रमाण कमी झाले. सोमवारी (दि. २८) शहरात कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. तर किमान तापमान १८.८ अंश सेल्सिअसवर होते. शहरात गेले तीन दिवस आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे वातावरण स्वच्छ झाले असून, सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे.
त्यामुळे तापमानात वाढ सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी ३२ अंशांवर आलेल्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर किमान तापमान १६ अंशांवर गेले होते. त्यातही सोमवारी वाढ झाली आहे. दरम्यान, शहरात उन्हाचा चटका व रात्रीचा थंडावा नागरिक अनुभवत आहे. येत्या २९ व ३० ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, कमाल तापमान ३२ व ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.