पुणे : चंदनाची झाडे चोरताना हटकणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून पसार झालेल्या एका चंदन चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, डेक्कन पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन चोरटे साथीदार जखमी झाले होते. या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या त्या दोन चंदन चोरांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना न देता जखमी हल्लेखोरांवर डॉक्टरांनी गुपचूप उपचार केल्यामुळे डॉक्टरही आता रडारवर आला आहे. त्यामुळे डॉक्टरवरही गुन्हा दाखल होण्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहेत. आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले आहेत. त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान पसार आहेत. डेक्कनमध्ये २२ ऑक्टोबरला मध्यरात्री अडीचच्या सुमारास विधी महाविद्यालय रस्ता परिसरात पोलिस शिपाई महेश तांबे, गणेश सातव गस्त घालत होते.
त्या वेळी जानकी व्हिला बंगल्याजवळ आरोपी गोलवाल आणि साथीदार अंधारात असल्याची चाहूल पोलिसांना लागली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर हल्ला केला, त्या वेळी प्रसंगावधान राखून पोलिस शिपाई तांबे यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या पायाच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यामध्ये दोन आरोपी जखमी झाले. त्यांनी रात्रभर दुचाकीवर प्रवास करत संभाजीनगर गाठले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी एमएलसी दाखल न करता जखमींवर उपचार केल्याचे उघडकीस आले आहे.