संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर भाजप नेते सुजय विखे यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला होता. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ करत देशमुखांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर रविवारी पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली. आणि जामीन देखील मंजूर झाला आहे.
धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर काल पुण्यातुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुखांना अटक केली. वसंत देशमुखांना अटक झाल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
याबाबत संगमनेरचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे म्हणाले की, वसंत देशमुख यांची अटकेपूर्वी तब्येत बिघडल्याने आणि त्यांची बायपास झालेली असल्याने संगमनेर येथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांना नाशिकमध्ये पाठवण्यात आले. काल सकाळी त्यांना संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वसंत देशमुखांना जामीन मंजूर केला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती देविदास ढुमणे यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील एका सभेत वसंत देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सभेत बोलताना देशमुख यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर खालच्या भाषेत टीका केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीसाठी जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुखांना अटक केली होती.