नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे सद्यस्थितीत १५ पैकी तब्बल ११ मतदारसंघांमध्ये अधिकृत पक्षाच्या विरोधात बंड पुकारले गेले आहे. अर्थातच, माघारीनंतरच या बाबतचे चित्र स्पष्ट होणार असून, किती जणांचे ‘बंड’ मोडून काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाशिक पूर्वमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने गणेश गिते यांनी शरद पवार गटात सहभागी होत उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदार असणाऱ्या जगदिश गोडसे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. येथून लक्ष्मण मंडाले यांनीही दंड थोपटले आहे.
नाशिक मध्यची जागा काँग्रेसला न सुटल्यामुळे या पक्षाच्या डॉ. हेमलता पाटील यांनी बंड पुकारले आहे. इगतपुरीत ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षापूर्ती न झाल्यामुळे त्या महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरत आहेत.
नाशिक पश्चिममध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटील हे मनसेकडून रिंगणात उतरले आहेत. तर शशिकांत जाधव अपक्ष लढत आहे. माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी रिंगणात उतरत आघाडीचा धर्म न पाळण्याचे संकेत दिले आहेत.
निफाडला उघडपणे बंडखोरी दिसत नसली, तरी भाजपचे यतीन कदम हे काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे. तशीच परिस्थिती येवला मतदारसंघातही आहे. येथून ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता दराडे कुटुंबीय महाविकास आघाडीचा धर्म पाळणार काय, तसेच माजी आमदार मारोतराव पवार, त्यांचे पुतणे गत दोन वेळा छगन भुजबळ यांच्या विरोधात लढलेले संभाजी पवार नक्की कोणाची पाठराखण करतात, याकडे लक्ष वेधले गेले आहे. नांदगावी हाय व्होल्टेज सामना होणार आहे. अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.
कोणत्या पक्षात किती बंडखोर ?
महायुती तसेच महाविकास आघाडीला बंडखोरांचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महायुतीतील सात जणांनी बंडांचे निशाण फडकावले आहे. त्यात सर्वाधिक पाच बंडखोर भाजपातील तर अजित पवार गट व शिंदे गटाचा प्रत्येकी एक बंडखोर आहे. महाविकास आघाडीतील सहा जणांनी बंड पुकारले आहे. त्यात शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गट यांचे प्रत्येकी दोन बंडखोरांनी आव्हान दिले आहे.