मुंबई : वरळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने मुलाने स्वत:च्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यानंतर स्वत:वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न मुलाने केला आहे. ही घटना वरळीमधील गांधीनगर येथील शिवसंकल्प एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक 5 मध्ये घडली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्वतःच्या आईची हत्या करून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ललिता तिरुगनना संबनधहम (वय-77) असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमी झालेल्या बालशनमुघम कुप्पूस्वामी या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या ललिता संबनधहम या वरळीतील गांधीनगर शिवसंकल्प सोसायटी येथे राहत होत्या. आरोपी मुलगा बालषण्मुगमची पत्नी जीएसटी विभागात क्लास टू ऑफिसर आहे. बालषण्मुगम हे स्वतः एका मोठ्या कंपनीत काम करत होते. एप्रिल महिन्यात त्यांची नोकरी गेली. त्यांच्या डोक्यावर 36 लाखांचे कर्ज होते. नोकरी गेल्याने ते बँकेचा हफ्ता भरू शकत नव्हते. दरम्यान, हे कर्ज कसे फेडायचे या विचारातच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी बाळकृष्ण हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. पैशांवरुन आई आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून रागाच्या भरात त्याने आईची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने घरातील चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार केले. यात मुलगा जखमी झाला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती तातडीने कंट्रोल रुमला दिली. कंट्रोल रुममधून ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आई आणि मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. त्यादरम्यान, डॉक्टरांनी दोघांना तपासले असता त्यांनी ललिता यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.