पुणे : पुण्यातील विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी चंदन चोरट्यांना हटकले. यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना (दि. 22 ऑक्टोबर) रोजी घडली आहे. चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातून गोळीबार केला होता. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन पसार झालेल्या चंदन चोरट्याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे.
आसिफ हरुनखान गोलवाल (वय 24, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून आरोपी आसिफ गोलवालला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक काय घडलं?
शहरातील विधी महाविद्यालय रस्ता परिसरात (दि. 22 ऑक्टोबर) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस शिपाई तांबे आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्यावेळी चोरटे प्रभात रस्त्यावर एका गल्लीत शिरले. या परिसरातील एका सोसायटीतील चंदनाचे झाड कापण्याच्या तयारीत संबधित चोरटे होते. त्यावेळी चोरट्यांना पाहून पोलिसांना संशय आला.
त्यांनी चोरट्यांना थांबवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाच ते सहा चोरट्यांनी पोलीस शिपाई तांबे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी झटापटीत तांबे यांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तांबे यांनी पिस्तूलातून चोरट्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
पोलीसांना तांत्रिक तपासात चोरटे छत्रपती संभाजीनगरकडे पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील जंजाळ गावातून आरोपी गोलवाल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.