जालना : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असल्याने त्याचा फटका महायुतीला काही जागांवर बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे काही चुकले नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देखील दिला. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावल्या. मराठ्यांना आत्महत्या करायला लावल्या, दहा वर्षांपूर्वी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले. म्हाडाचे घरकुल गरिबांना द्यायचे ते त्यांनीच घेतले. खूप चांगले काम केले आहे त्यांनी, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिले हे चांगले काम केले. परत मराठ्यांना एससीबीसी आरक्षण देऊन ईडब्ल्यूएस घातले, हे देखील छान काम आहे. दादांचे मुकेच घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केले. मराठ्यांच्या पोरांवर केसेस केल्या, महिलांना बंदुकीने ठोकले, गोळ्या घातल्या, काय चांगले काम केले. देव माणूस आहे दादा, शेंदूर लावायला पाहिजे? असा घणाघात मनोज जरांगे यांनी चंद्रकांत पटलांवर केला आहे.