पुणे : पुण्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन शक्कल लढवित आहेत. वाघोली परिसरात एका कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी १७ लाख ५१ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी गोदामात चोरी करण्यासाठी छोटे भुयार तयार करून आत शिरुन तांब्याच्या तारा चोरुन नेल्या. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत संदीप गुरव (वय-५०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात नगर रस्त्यावर गुरव यांची अँग्रीको एनर्जी रेंटल इंडिया प्रा. लि. कंपनी आहे. तांब्याच्या तारा, तसेच अन्य इलेक्ट्रीकल्स साहित्याची कंपनीत निर्मिती केली जाते. या कंपनीच्या चारही बाजूने मोठे पत्रे लावण्यात आले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री पत्र्याच्या शेडच्या परिसरातील माती उकरुन आत जाण्यासाठी छोटे भुयार तयार केले.
तसेच पत्र्याचे नट उचकटून आत प्रवेश करून कंपनीच्या आवारातील १७ लाख ५१ हजार रुपयांचे ७३ तांब्याच्या तारांचे बंडल चोरुन नेले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम पुढील तपास करत आहेत.