IND vs NZ Test Series : भारताने न्यझीलँडविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्याबरोबरच मालिका सुद्धा गमावली आहे. न्यूझीलंडने दोन सामने जिंकत मालिका आपल्या खिशात टाकली आहे. त्यामुळे आता भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीच्या स्थानाबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचा संघर्ष सुरु आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सलग दोन सामने गमावल्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहे.
भारतीय संघ अंतिम फेरी गाठणार की नाही याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. कारण भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीतील एकूण 6 सामने बाकी असून त्यापैकी 4 सामन्यात काहीही करून विजय मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा इतर संघांच्या कामगिरीवर विसंबून राहावं लागणार आहे. विशेषकरून श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भारताच्या शर्यतीत अडसर ठरू शकतात.
दुसरीकडे, न्यूझीलंड संघाला अंतिम फेरीची तितकीच संधी आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांवर भारताचं जर तरच गणित अवलंबून असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताने मालिका गमावली असली तरी शेवटचा सामना जिंकणं गरज आहे. पण भारताची एकंदरीत कामगिरी पाहता क्रीडाप्रेमींना विजयाबाबत शंका निर्माण होत आहे. असं असताना पत्रकारांनी कर्णधार रोहित शर्मावर प्रश्नांचा मारा केला आहे. तसेच त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत विचारलं. तेव्हा रोहित शर्माने टाळलं पण तो उत्तर देऊन गेला.
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत आता विचार करणं खूपच लवकर होईल. सध्या आम्ही मालिका गमावल्याने दुखावलो आहोत. आम्ही मालिकेत खूपच वाईट पद्धतीने खेळलो. हा आमचा सामूहिक पराभव आहे.” , असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं. इतकंच काय रोहित शर्माने फलंदाजांच्या शॉट सिलेक्शनवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. “आम्ही स्वीपिंग आणि रिव्हर्स स्वीपिंगबद्दल बोलत आहोत, पण अखेरीस जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी करतो तेव्हा तो काय विचार करतो यावर अवलंबून असतो. तो निर्णय घेणे फलंदाजावर अवलंबून असते”., असं रोहित शर्माने सांगितलं.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमवला असला तरी अव्वल स्थानी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही प्वॉइंटचा फरक आहे. तिसऱ्या सामन्यात पराभव झाल्यास भारताच्या विजयी टक्केवारीवर जबर परिणाम होणार आहे.