अहमदनगर : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. वादग्रस्त विधान करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वसंतराव देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव देशमुख यांना नगर जिल्ह्याबाहेरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, त्यानंतर पोलिस त्यांच्या शोधात होते, ते नगर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तसेच संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.
नेमकं काय घडलं?
जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये वातवरण चांगलंच तापलं होतं. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं होतं.
वादग्रस्त विधानाप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा..
जयश्री थोरातांवर केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर वसंतराव देशमुखांचा शोध घेतला जात होता, मात्र ते फरार झाले होते, अखेर पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.