बापू मुळीक
पुरंदर : पवारवाडी(ता. पुरंदर) येथे स्मशानभूमीजवळ ओढ्यामध्ये मृत नवजात पुरुष अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ते अर्भक ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार संतोष शिंदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे ते पंढरपूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील पवारवाडी स्मशानभूमी जवळील ओढ्याच्या पाण्यात एक नवजात अर्भक दिसल्याची माहिती झेंडेवाडीचे पोलीस पाटील विकास झेंडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला फोन द्वारे दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आदित्य भोसले यांच्या मदतीने पाण्यातून ते अर्भक बाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर ते अर्भक ताब्यात घेतले.
अज्ञात इसमाने ते अर्भक ओढ्याच्या पाण्यामध्ये टाकलं असावं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.