पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. मात्र, प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस आता बजावण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे कोथरुड विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रथम प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारांना आवश्यक सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करावे, मतदारांना सुविधा उपलब्ध करुन मतदान प्रक्रिया सुखकर होईल याबाबत दक्षता घ्यावी, असेही डॉ. सुहास दिवसे म्हणाले.
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची कार्यपद्धती समजून घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. मतदानाची प्रक्रिया ही अभ्यासपूर्वक व नियमांचे काटेकोरपणे पालन करून पूर्ण करावी, असेही डॉ. सुहास दिवसे म्हणाले.