पुणे : परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात तापामानात घट झाल्याने सकाळच्या हवेत गारवा जाणवू लागला आहे. धुक्यासह दव पडत असल्याचेही चित्र दिसत आहे. सकाळी गारठा वाढू लागल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका मात्र तापदायक ठरत आहे. त्याशिवाय राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक वातावर तयार होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. पावसाने उसंत घेतल्यानंतर राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातवारण तयार झाले असून आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात थंडीची चाहूल..
राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानात हळू हळू घट होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. काही ठिकाणी सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात पारा १७ अंशांच्या खाली आला आहे. राज्याचे किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढत जाणार आहे.
वातावरणामुळे आजारात वाढ..
परतीच्या पावसाने थांबा घेतल्यानंतर राज्यात सध्या ढगाळ वातावऱण आहे. हवामानात बदल झाल्यानंतर आजारपणात वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात ढगाळ वातावरणामुळे लोकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. वातावरण बदलामुळे खोकला, सर्दी, अस्थमा बळावण्यासह गंभीर आजारांचे विषाणू पसरण्याची सुद्धा भीती असते.