पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोड चिट्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारीही देण्यात आली.
दरम्यान, इंदापूर येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हर्षवर्धन पाटील यांनी त्या पैशांचे काय केले? असा प्रश्न जाहीर सभेत अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी संस्थांना केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये निधी म्हणून दिले, त्याचा त्यांनी योग्य वापर केला तर ठीक अन्यथा त्या पैशांच्या विनियोगाची चौकशी करण्यात येईल, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. तसेच केंद्र सरकार कधीही पक्ष पाहून पैसे देत नाही. मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना सहकार मोठा झाला पाहिजे, असाच दृष्टिकोन असतो, असाही मोहोळ यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले, असे नाही आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. मात्र, मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांची आहे, तसे झाले नसेल तर चौकशी करावी लागेल, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.