आपल्या निसर्गात अशा अनेक वनस्पती, फळझाडं आहेत, ज्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. त्यात कारलं ही अशी भाजी आहे ती चांगलीच गुणकारी मानली जाते. कारलं चवीने जरी कडू असलं तरी ते आरोग्यासाठी लाभकारकच असतं. मात्र, काही लोकांसाठी हेच कारलं आजारांना निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
कारलं खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सोडवता येतात किंवा टाळता येतात. मात्र, जर तुम्ही हे कारलं जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला टाइप-1 मधुमेहाचा त्रास असेल तर हे कारलं खाणं टाळावं. टाईप 1 मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी कारल्याच्या भाजी किंवा कारल्याचा रस पिणे चांगले नाही. कारण, यामुळे अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
गरोदर महिलांनीही कारल्याचे सेवन टाळावे. कारण त्याचा गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो आणि पोटातील बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. किडनी स्टोनचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हीदेखील कारलं खाणं टाळावं. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असते, त्यामुळे जे लोक त्याचे सेवन करतात, त्यांना किडनी स्टोनची समस्या असू शकते. तसेच कारल्यामुळे मुतखड्यातील विषाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा लोकांनीही हे खाणं टाळलं पाहिजे.