नवी दिल्ली: देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत कर्ज मर्यादा दुप्पट करून २० लाख रुपये केली आहे. वित्त मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या वाढीद्वारे आम्ही मुद्रा योजनेचे एकूण उद्दिष्ट पुढे करू इच्छितो. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
२३ जुलै २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली जाईल, असे सांगितले होते. लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन म्हणाल्या होत्या, ज्यांनी यापूर्वी ‘तरुण’ श्रेणीत कर्ज घेतले आहे आणि यशस्वीरीत्या परतफेड केली आहे, अशा उद्योजकांसाठी मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाखांवरून २० लाख रुपये करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली. नॉन-कॉर्पोरेट, बिगर-कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या क्रियाकलापांसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे सुलभ तारण-मुक्त सूक्ष्म कर्ज प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.