पुणे : पुण्यात अवैद्य धंदे सुरु असल्याचे समोर आले आहे. शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास छापा टाकण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही खडक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा सुरू होता.
या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ६० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच मोबाइल संच आणि एक लाख दोन हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच परिसराजवळ असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यावर कारवाई करुन तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत नंदू नाईक याचा छत्रपती शिवाजी रस्त्याजवळील जनसेवा भोजनलयाच्या इमारतीत शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या कारवाईत ६० जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. नंदू नाईक हा मध्यभागात ‘मटका किंग’ या टोपण नावाने ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगाराचे अड्डे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाई झाल्यानंतर जुगार अड्डे काही दिवस तात्पुरते बंद ठेवले जातात. मात्र, काही दिवसांतच पुन्हा सुरु करण्यात येतात.
दरम्यान, या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री छापा टाकून एक लाखांची रोकड तसेच मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात देखील याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नंदू नाईक याने पुन्हा जुगार अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.