बारामती: सावळ (ता. बारामती) येथील जमिन विक्री प्रकरणात दुसरीच महिला उभी करत मुखत्यारपत्राद्वारे फसवणूक केल्याच्या प्रकरणात राज्य शासनाचे निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर यांना तालुका पोलिस ठाण्याकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली.
मार्च २०२३ मध्ये या प्रकरणाने बारामतीत मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी नाझीरकर यांच्यासह १२ जणांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (रा.चतुःश्रृंगी, पुणे), राजेश भगवान लोंढे (रा. माळवाडी, हडपसर, पुणे), श्रीनिवास अरुण कवडे (रा. महंमदवाडी, पुणे), सनी लक्ष्मण चव्हाण (रा.आमराई, बारामती), सोमा देवकर, ओंकार शिंदे, राज सोनवणे, सोहेल शेख (पूर्ण नावे नाहीत, रा. बारामती) व अन्य एका अनोळखीचा समावेश होता. या प्रकरणी अर्जुन यशवंत झगडे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात ११ जणांची फसवणूक झाली होती.
फिर्यादी व त्यांचे मित्र जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जानेवारी २०२३ मध्ये त्यांना सनी, सोमा, ओंकार व राज सोनवणे हे भेटले. त्यांनी सावळमधील गट नं. २६९ मधील नाझीरकर यांचे ११ एकर क्षेत्र त्यांच्या पत्नीच्या नावे असून ते विकण्याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार नाझीरकर यांच्याशी भेटीनंतर चार कोटी रुपयांना व्यवहार ठरला होता. या क्षेत्राचे मुखत्यारपत्र संगीता नाझीरकर यांच्या वतीने राजेश लोंढे व श्रीनिवास कवडे यांच्या नावे करण्यात आले.
विसारापोटी २५ लाखांची रक्कम देण्यात आली. परंतु, मुखत्यारपत्र करताना संगीता नाझीरकर यांच्या जागी दुसरीच महिला उभी करण्यात आली. तिने खोटी कागदपत्रे देत मुखत्यारपत्र तयार करून दिले. जमिन व्यवहारापोटी २ कोटी ५० लाख रुपये रोखीत स्विकारण्यात आले, तर ६२ लाख ३० हजारांची रक्कम संगीता नाझीरकर यांच्या बँक खात्यावर अशी एकूण ३ कोटी ३७ लाखांची रक्कम देण्यात आली. परंतु, या प्रकरणातील मुखत्यारपत्रच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागला होता. या प्रकरणात नाझीरकर यांचा जामिन बारामती सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते उच्च न्यायालय व तेथून सर्वोच्च न्यायालयात गेले. ऑगस्ट २०२३ मध्ये तेथेही जामिन फेटाळला गेला. त्यानंतर एक वर्षाहून अधिक काळानंतर ते पोलिसांच्या हाती लागले आहेत.