मुंबई : संगमनेरमध्ये भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संकल्प मेळाव्यात बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. राज्यभरातून सुजय विखे पाटील यांच्यासह वसंतराव देशमुख यांच्यावर टीका केली जात आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांची कानउघाडणी केली आहे. अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांना कॉल करून वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
महायुतीला अडचण होईल अशी वक्तवेय करू नये, अशा कडक शब्दात अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांना सुनावलं आहे. अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांना फोन करून त्यांची कानउघाडणी केली. दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आमच्या संकल्प सभा सुरू राहतील. आम्ही पाप केलं नाहीय. वाद कुणी सुरू केला हे पाहिलं पाहिजे. बाप हा शब्द कुठून आला? कालच्या घटनेचा निषेध व्यक्त होतो आहे. हरकत नाही. परवा आमच्या मतदारसंघात येऊन माझ्याबद्दल हा मुलगा डोक्यावर पडलाय. याला अक्कल नाही, मूर्ख आहे असं बोललं गेलं. आता यापुढे शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात कुणी बोललं तर त्याला जशास तसं उत्तर देऊ अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी इशारा दिला आहे.
धांदरफळ इथं गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ
सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत सभा बंद पाडली आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं. वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. तसेच सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या. तसेच गाडीची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे.