सागर जगदाळे
भिगवण : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यावर बाळासाहेब इंगळे हे नांदेड ते मुंबई अशी सायकलवारी करताना मराठा समाजाला आरक्षण द्या, तसेच मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन समाजाला न्याय द्या, या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. परंतु, पुढे त्या मागण्यांमधील काही मागण्यांची पूर्तता झाली. मात्र, बहुतांश मागण्यांची पूर्तता झाली नसल्यामुळे पुन्हा एकदा प्रकाश इंगळे हे नांदेडहुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्या व मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याशिवाय शासनाने काढलेली ७५ हजार नोकर भरती करू नये या मागण्या घेऊन पुन्हा सायकलस्वारी करत आहेत. मुंबई येथे जात असताना भिगवण येथे मराठा महासंघ आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यलयात सायकलस्वराचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. पांडुरंग जगताप, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोशल मिडिया प्रमुख भूषण सुर्वे, पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहायक विशाल धुमाळ, राहुल ढवळे, छगन वाळके, हर्षवर्धन ढवळे, दिनेश भोईटे यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब इंगळे यांच्या धाडसी सायकल स्वारीचे महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आहे.
मराठा समाजाचा इतिहास हा अतिशय दैदीप्यमान असून सदर इतिहासाचे जतन करणे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे कर्तव्य आहे त्याच्यासाठी मी सदर सायकल स्वारी करून मान्यवरांना भेटत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.