दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आणि त्यांची प्रचार यंत्रणाही कामाला लागली. तसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यात उमेदवारीवरून घमासान सुरू आहे. हा वाद काही मिटण्याचा नाव घेत नसून उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली तरी सुद्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
रमेश थोरात पक्षात येऊन लढायला तयार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाच्या निष्ठावंतानी उमेदवारी आपल्यालाच मिळावी असा इशाराच दिला आहे. त्यामुळे निष्ठावांतांना राखण्याच्या नादात शरद पवारांच्या पक्षाकडून हा आश्वासक गड निसटू शकतो असे चित्र निर्माण झाले आहे. कारण जेव्हा पासून महायुतीकडून आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कुल यांनी प्रचार यंत्रणा सक्रिय करून कार्यकर्त्याच्या बैठका, गाव भेटी-दौरे, जिल्हा परिषद पंचायत समिती गतनिहाय बैठका घेऊन प्रचारात आघाडी मिळवली आहे. तसेच आमदार राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित झाली आहे.
उलट पाहता विरोधी गटात मात्र अजून उमेदवारीच निश्चित नसल्याने शरदचंद्र पवार पक्ष उमेदवारी आज उद्या करीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटची तारीख संपेपर्यंत लटकत ठेवते की काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. या दोन आप्पांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो की काय? असे चित्र दौंडच्या जनतेला पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उमेदवारी वरून अनेक बैठका झाल्या असून अजूनही बैठका सत्रच सुरू आहे. त्यात उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असून प्रचारासाठी जेमतेम २० ते २५ दिवसचं राहिले असून जर एक एक दिवस वाया जात असेल, तर पुढील नियोजन कसे करणार? आसा संतप्त सवाल दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.