संगमनेर : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सभा पार पडत आहेत, नेते प्रचाराला लागले आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ इथं भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असुन वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले वसंतराव देशमुख?
‘भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात.., माझा बाप सगळ्याचा बाप., काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना.. सगळ्या तालुक्याला माहिती आहेत.’ असं वादग्रस्त वक्तव्य वसंतराव देशमुख यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला असून वातावरण चांगलाच पेटलं आहे.
संगमनेरमध्ये तणाव..
भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर जयश्री थोरात यांनी या विधानाचा निषेध केला आहे. रात्रभर त्या पोलीस स्टेशनबाहेर बसून होत्या. त्यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पहाटेच्या सुमारास वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल..
वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून स्वत: सुजय विखे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. वसंतराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री आणि बहिण दुर्गा तांबे यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर बसून निषेध केला आहे.
सुजय विखेंची प्रतिक्रिया काय?
जयश्री यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सभा आटोपून परत जाणा-या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करून चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, अशाप्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पण पोलिसांनी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. दंगल घडवण्याचं काम कोण करत आहे? हे पोलिसांनी पाहावं, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.