वाघोली (पुणे) : दिवाळीपूर्वी कपड्याच्या खरेदीची धामधूम सुरु झालीय आहे. लोकांची खतरेदीसाठी लगबग बघायला मिळत आहे. अशातच दुकानांमध्ये युएसपीए ब्रँडचा लोगो असलेले बनावट कपड्यांची विक्री करीत असल्याप्रकरणी वाघोलीतील साई ब्रँड होमच्या दुकान मालकावर कॉपीराइट कायद्यांतर्गत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 4 व 6 ने कारवाई केली असून तब्बल 4 लाख 94 हजारांचे कपडे दुकान व गोडाऊनमधून जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव सत्यवान नरवडे (रा. वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. वाघोलीतील दुकानात युएसपीए कंपनीचे कॉपीराईट केलेले बनावट कपडे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नीरजकुमार सिंग (रा. उत्तरप्रदेश) यांनी पुणे पोलिसांकडे पोलीस मदतीचा अर्ज दाखल केला.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 4 व 6 चे कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून संयुक्तपणे डमी ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. दुकान व गोडाऊनमधून 760 शर्ट जप्त करण्यात आले. दुकान मालक नरवडे यांच्यावर कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युएसपीए कंपनीतर्फे नीरजकुमार नरेंदर सिंग (रा. उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.