पुणे : राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पाऊस आता राज्यातून माघारी फिरला असून आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये आज कोरडे वातावरण असणार आहे. तसेच महाबळेश्वर, पुण्यातील घाटमाथ्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी आणि कोल्हापूरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या माघारीनंतर राज्यात आता थंडीचे वेध लागले आहेत. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२८ आणि ३० ऑक्टोबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले होते. रात्री पाऊस आणि दिवसा उकाडा यामुळे घामाच्या धारा निघत होत्या. सायंकाळपासून पहाटेपर्यंतच थंड वाऱ्याची हलकी झुळूक जाणवते. दिवसा मात्र अजूनही उकाडाच आहे. त्यामुळे सारेच थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. नोव्हेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे या कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात आज हवामान ढगाळ राहणार आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३२ अंशसेल्सिअस असेल. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही हवामान कोरडे राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. पण थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान तापमानामध्ये घट झाल्याचे बघायला मिळणार आहे. दिवाळीमध्ये पाऊस पूर्णपणे माघार गेलेला असेल अन् राज्यात थंडीची चादर पसरलेली दिसेल. राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होणार आहे.