नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी ‘मोठं गिफ्ट’ जाहीर केले आहे. यंदा 80 वर्षांवरील पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे, असे सरकारने म्हटले आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना अनुकंपा भत्ता नावाची अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे.
पेन्शन संबंधित मंत्रालयाने 80 वय पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत केंद्र सरकारच्या नागरी सेवा विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या अतिरिक्त भत्त्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुलभ करणे हा मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. CCS (पेन्शन) नियम 2021 च्या नियम 44 मधील उपनियम 6 मधील तरतुदीनुसार, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार पेन्शन आणि अनुकंपा भत्ता दिला जाणार आहे.
त्यानुसार, 80 ते 85 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मूळ पेन्शनच्या 20 टक्के, तर 85 ते 90 वर्षे वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना 30 टक्के पेन्शन मिळणार आहे. त्याच वेळी, 90 ते 95 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक मूलभूत पेन्शनच्या 40 टक्के आणि 95 ते 100 वर्षे वयोगटातील लोकांना 50 टक्के पेन्शन मिळतील. 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुपर सीनियर्स 100 टक्के मूळ पेन्शनसाठी पात्र असतील. सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.