-दीपक खिलारे
इंदापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे राजकारण रंगले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवारांच्या यादी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांकडून अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार) पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार दतात्रय भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अमोल मेटकरी, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस स्टेशन समोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटलांनी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले त्याचे काय केले. सगळं गोड-गोड बोलून आमच्याकडून अमित शहांकडून मंजूर करून घेतलं आणि सोयीचे आले की निघून गेले. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा. अजित पवारने असं आयुष्यात कधी केलं नाही. जो कोणी उभा राहील त्याचा एक इमाने इदबारे प्रचार केला,” असे अजित पवार म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना गद्दार संबोधले.
“देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील आणि मी सागर बंगल्यावर बसलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आता तुम्ही सगळ्यांनी काम करा. आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. तेव्हा हर्षवर्धन पाटील म्हणाले, आमदारकीचं काय. मी म्हटलं आमदारकीच्या संदर्भात मी काय निर्णय घेणार नाही. त्यानंतर ते म्हटले देवेंद्र फडणवीस जे म्हणतील ते मान्य असेल. त्यानंतर मी हो म्हटलं हर्षवर्धन पाटील सुद्धा हो म्हणाले. इंदापूरला पाणी कुठून आणायचं, कसं आणायचं त्याची जबाबदारी माझी. माझं आणि देवेंद्र फडणवीस याचं बोलणं झालं आहे. काँग्रेसवाल्यांनी जेवढी तरतूद केली नाही, तेवढी आम्ही अल्पसंख्याक लोकांसाठी तरतूद केली आहे. लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका, हे खोटं बोलतात महाराष्ट्रचं गुजरातला गेल्याचं सांगतात. पण, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिला क्रमांकावर आहे. लाडकी बहीण योजना बंद केल्याचे सांगतात, पण तसा स्टे दाखवा, असे म्हणत फेक नेरेटीव्हवरुन अजित पवारांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? असे म्हणत अमित शाह यांच्याशी आपली जवळीक असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. तसेच, अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का? असा खोचक सवालही अजित पवारांनी विचारत हर्षवर्धन पाटील यांना लक्ष्य केलं.
इथं आलो तर मित्र पक्षाच्या लोकांना बसायला जागा नाही, पुढच्या वेळी यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका, रात्री बारा वाजता गरज लागली तरी मला सांगा, असे म्हणत अजित पवारांनी इंदापूरकरांना सोबत राहण्याचे आवाहन केले.
या वेळी बोलताना आमदार दतात्रय भरणे म्हणाले, आम्ही केलेल्या विकासामुळे विरोधकांना पोटशुळ झाला आहे. गाव शहराचा विकास झाला आहे. दुधसंघ व कारखान्याचा मलिदा कुणी खाल्ला असा प्रश्न विचारून आपल्या कार्यकाळात तालुक्यात सहा हजार कोटी रुपयांचे विकास कामे केली. त्यामुळे विरोधक आपल्यावर टिका करतात.
यावेळी आमदार अमोल मेटकरी , प्रदिप गारटकर, संजय सोनवणे, वासुदेव काळे, हनुमंत कोकाटे, दिपक काटे, तानाजी थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी आभार शुभम निंबाळकर यांनी मानले.