पुणे : पुण्यातील नवले पूल परिसरात देहविक्री करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असून, या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या वेळोवेळी तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुल परिसरात रस्त्याच्या कडेला उभा राहुन काही महिला देहविक्री करत आहेत. त्या महिलांच्या अश्लिल हावभावामुळे या भागातील नागरिकांना त्रास होत होता. तेथून जाणाऱ्या सामान्य महिलांना याचा त्रास व्हायचा. रस्त्याच्या कडेला थांबून देहविक्री करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी सिंहगड रस्ता पोलिसांकडे अनेकदा केली होती. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. नवले पूलाजवळील सेवा रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान,नवले पूल परिसरात रात्री थांबलेल्या महिलांकडून नागरिकांना त्रास देण्यात येत होता. त्या अश्लिल हावभाव करत असल्याची माहिती उपनिरीक्षक जायभाय यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन आठ महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.
देहविक्री करणऱ्या महिलांविरुद्ध यापूर्वी देखील कारवाई करण्यात यायची. त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणुन त्यांना सुधारगृहात पाठविले जात होते. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा महिलांकडे पीडित म्हणून पाहिले जाते. सिंहगड रस्ता पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर नवले पूल परिसरात थांबणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे या परिसरातील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी माहिती देण्यात आली आहे.