पुणे : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतलेली दिसून येत आहे. पण राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण असणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या देशभरात पाऊस कोसळत आहे.
राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील २४ तासांत राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह कोकणात पाऊस आज हजेरी लावू शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात आज पूर्णपणे ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात आज ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर घाटपरिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुण्याचा काही भाग, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी,पालघर, रायगड, ठाणे या क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. इतत्र हवामान ढगाळ राहू शकते.