बापू मुळीक
पुणे : दिवे घाट परिसरातमध्ये मोठी दरड कोसळल्याची बातमी समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नसल्याचे समजते आहे. घटनास्थळी फुरसुंगी पोलिस हजर झाले असून दरड बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू केले गेले आहे. परंतु, या दरम्यान घाटात दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ज्या ठिकाणी ही दरड कोसळली त्याच्या जवळच एक धबधबा असून याठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ बघायला मिळते. शिवाय गुरूवार असल्याने या मार्गावर वाहतूक देखील जास्त असते. परंतु सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नसल्याचे समजते.
पुरंदर व हवेली तालुक्याला जोडणाऱ्या दिवे घाटाचे रुंदीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. या घाटात अशी अनेक धोकादायक ठिकाणे आहेत जी कधीही कोसळू शकतात. याबाबत आजच्या घटनेत सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही. दिवे घाट हा शहराजवळ असल्याने याठिकाणी संध्याकाळी अनेक पर्यटक धोकादायक रित्या बसलेले दिसून येतात. आजच्या घटनेतून लोकांनी बोध घ्यावा, तसेच हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.