पुणे : लोकसभा निवडणुकीत एकही जागा न देता सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून महायुतीचा धर्म पाळण्यात आला आहे. गेली १० वर्षापासून रिपाइं हा महायुतीचा धर्म पाळत आहे. मात्र, राज्यात रिपाइंला मोठा भाऊ असलेला भाजप चांगली वागणूक देत नाही. राज्यात किमान १० ते १२ जागा सोडण्यात याव्यात, अशी मागणी असताना जर एकही जागा सोडली जाणार नसेल, तर आज (गुरुवार, दि. २४) पासून तटस्थपणाच्या भूमिकेत रिपाइं आठवले गट असणार आहे, असा दावा पुण्यात पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाने मुंबईतील चेंबूर, धारावी, अहमदनगरमधील श्रीरामपूर, उत्तर नागपूर, यवतमाळमधील खेड, पुण्यातील पिंपरी-चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ रिपाइंला द्यावेत, अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर जागावाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
याबाबत अधिक महिती देताना डॉ. धेंडे म्हणाले, की केंद्रात राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिपद दिले असले, तरी राज्यात भाजपकडून आम्हाला चांगली वागणूक दिली जात नाही. महायुतीमध्ये केवळ तीन पक्षाचे नेते बसून निर्णय घेत आहेत. आम्हाला कोठेही विश्वासात घेतले जात नाही. पश्चिम महाराष्ट्रात आमच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा एकच खासदार झाला आहे. ही बाब महायुतीने विसरू नये.