मंगळवेढा : नगरपालिका शाळेतील मुलास तुम्ही अपशब्द वापरून का बोलला ? असे एका शिक्षिकेने विचारल्याच्या कारणावरून बुटाने मारण्याची धमकी देऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक सतीश नारायण आवताडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील फिर्यादी शिल्पा बापूराव अगसर-गोपाळकर (वय ४७) या नगरपालिका कन्या शाळा नं. २ मध्ये शिक्षिका असून, इयत्ता तिसरीतील विद्यार्थी चिखलामध्ये पाय भरवून वर्गामध्ये येत असताना फिर्यादीने त्यास पाय धू, असे सांगितले असता त्याने त्याच्या वर्गातील बाटलीतील पाण्याने पाय धुतला. मात्र, तो स्वच्छ न झाल्याने जवळ असलेल्या नगरपालिका शाळा नं. १ मध्ये त्याने हौदावर जाऊन पाय धुतले.
सदरचा प्रकार नगरपालिका मुलींची शाळा नं. १ चे प्रभारी मुख्याध्यापक सतीश नारायण आवताडे यांनी पाहिला व शाळेच्या बाहेर येऊन त्या विद्यार्थ्यांस बोलावून दरडावत तू तुझ्या शिक्षकाच्या मांडीवर बसून पाय धुवून घे, असे अर्वाच्च भाषेत म्हणत ते निघून गेले.
दि. १८ रोजी दुपारी २.४५ वाजता फिर्यादी व सोबतचे शिक्षक निंगाप्पा कोळी, सुवर्णा आवताडे, भारती नागणे असे सर्वजण शाळेसमोर असताना संशयित आरोपीही तेथे होते. दि. १७ रोजी सदर मुलास तुम्ही अपशब्द वापरून का बोलला ? असे विचारले असता तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही मध्ये बोलू नका, अशी एकेरी भाषा फिर्यादीस वापरून तू येथून निघून जा, नाही तर पायातील बूट काढून मारीन, त्याचबरोबर खालच्या पातळीवर येऊन अपशब्द उच्चारून शिवीगाळ केली.
यावेळी सोबतच्या शिक्षकांनी फिर्यादीस शाळेत नेले. घडला प्रकार नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू यांना सांगितला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढा शहर पोलीस करीत आहेत.