पुणे : निवडणूक कामासाठी सरकारी कामगारांची नियुक्ती करण्याची पद्धत जुनी आहे. कोणतीही निवडणूक असो मतदान आणि मतमोजणीचे काम हे सरकारी कामगार चोखपणे पार पडत असल्याचे दिसून आले आहे. पुणे महानगरपालिकेचे कामगारही दरवेळी मतदान आणि मतमोजणीचे काम करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीनंतर या पुणे महानगरपालिकेच्या कामगारांना मानधन दिले जाते.
सुमारे सात महिन्यांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी पुणे महानगरपालिकेच्या कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार या कामगारांनी सुरुवातीला निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गणेश कला केंद्र या ठिकाणी हजेरी लावली होती. यानंतर मतदान आणि मतमोजणीचे कामही त्यांनी केले होते. मात्र, या निवडणुकीसाठी देण्यात येणारे सरकारी मानधन न मिळाल्याने नाराजीचा सूर आहे. लोकसभेला मानधन न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत काम करावे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर, मानधन न मिळाल्याने या वेळी काम करताना उत्साह राहणार का? असाही मुद्दा कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.