नांदेड : नांदेड शहरातील आसरानगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोदावरी नदीत बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या चार वर्षाच्या मुलाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.२०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रॉयल रोड, फंक्शन हॉल येथे घडली आहे. अब्दुल अजीम (वय ३२) असं नदीत बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चैतन्यनगर परिसरातील आसरानगर येथे राहणारे अब्दुल अजीम हे रविवारी (दि.२०) रोजी गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने व गोदावरी नदीचा प्रवाह जास्त असल्याने यात ते वाहुन गेले. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. मंगळवारी (दि. २२) तेलंगणा येथील देवापूर शिवारात गोदावरी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती नातेवाइकांना समजताच कुटुंबावर दुसरा घाला पडला.
दरम्यान, घराशेजारील रस्त्यावर अंगणात खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलाला मंगळवारी सकाळच्या सुमारास एका वाहनाने उडवले. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत मुलाचाही मृत्यू झाल्याने आसरानगरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद विमानतळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.