लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकात वेगवेगळ्या दोन स्कूलबसचा अपघात सोमवारी (ता. २८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला असून यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर येथील एमआयटी या संस्थेच्या माईर्स विश्वशांती गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल व कुंजीरवाडी येथील भाग्य मधुरा शिक्षण मंडळाचे मुक्ताई मेमोरियल स्कूल या दोन स्कूलबसमध्ये हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्य मधुरा शिक्षण संस्थेची बस पुणे बाजूकडे चालली होती. यावेळी एमआयटी चौकात आली असता चौकातून एमआयटीतील इंग्लिश मिडीयम स्कूलची बस ही या वेळेत पुणे बाजूकडे जाण्यासाठी निघाली होती.
कुंजीरवाडी येथील भाग्य मथुरा शिक्षण संस्थेच्या चालकाला पुढे रस्ता दुभाजक ओलांडणाऱ्या बसचा अंदाज न आल्याने सदरचा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे स्कूलबसमधील विद्यार्थी हे घाबरून रडू लागले होते.
सदर अपघात झाल्यानंतर एमआयटीच्या बसमधील मुले ही आरडाओरडा करताना रडत असल्याचे निदर्शनास आले. कुंजीरवाडी येथील स्कूल बस रिकामी होती.