पुणे : खेड शिवापूर टोलनाका परिसरात सोमवारी (दि. २१) मध्यरात्री खासगी वाहनातून जप्त करण्यात आलेली पाच कोटींची रोकड पोलिसांनी आयकर विभागाकडे सोपवली असून, या विभागाकडून पुढील तपास जारी करण्यात आला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावरून चाललेल्या वाहनांची तपासणी करताना पोलिसांना एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड हाती लागली. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या आणि चलनातून बाद करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा समावेश आहे. कारमधील दोन जणांची पोलिसांनी चौकशी केली असता एका बांधकाम ठेकेदाराच्या व्यवहारातील ही रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या संदर्भात अधिकृत प्रक्रियेनुसार ही रक्कम व चौकशीचा प्राथमिक अहवाल आयकर विभागाकडे देण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी राजकीय वतुर्कात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही रोकड सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. तसेच, पोलिसांनी केवळ एक गाडी पकडली, अन्य चार वाहनांतील रक्कम पाटील यांच्या घरी पाठवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार पाटील यांनी या रकमेचा आपल्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.