पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी जिथे जिथे शक्य होईल, तिथे आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. काही राजकीय, अराजकीय संघटना, सरपंच परिषद, ग्राहक संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, वीजबील माफी, हमीभाव, शेतकरी आत्महत्या यांसारखे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.
तसेच या निवडणुकीत मतविभागणीचा फायदा आम्हाला जास्त होणार आहे, असेही ते म्हणाले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गांधीभवन येथे बैठक आयोजित केली होती. यात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. या वेळी ग्राहक चळवळ संघटनेचे शिवाजी खेडकर, सरपंच परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष दत्ता काकडे, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले की, सध्या राजकीय पक्ष, हे पक्ष राहिले नसून टोळ्या झाल्या आहेत. सध्या टोळीयुद्ध सुरू आहे. कोणासमोरही देशाचे, राज्याचे हित नाही. निवडणुकीत डोळ्यांसमोर ठेवून घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. जातिपातीच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्र वेगळ्या थराला नेऊन ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या गंभीर मुद्द्यांना कोणी स्पर्श करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवावे, यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहे, आम्हाला शेतकऱ्यांची २५ टक्के जरी मते मिळाली, तर आम्ही निवडून येणार आहे. निवडणुकीसाठी आम्ही २५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. १५० ते २०० उमेदवार उभे केले जातील.