पुणे : न्यूझीलंड विरुद्ध पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघासमोर पुढच्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. भारतीय संघासमोर केएल राहुल, सरफराज खान आणि शुभमन गिल यापैकी दोघांना निवडण्याचा पर्याय आहे. सरफराज खानने पहिल्या कसोटीत दीडशे धावा केल्यानं निवड समितीवर त्याच्या निवडीसाठी दबाव असणार आहे. दरम्यान, संजय मांजरेकर यांनी सरफारजला संघात घेतलं पाहिजे असं म्हटलं आहे. पण भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मात्र असा कोणताही दबाव घेतला नसल्याचं दिसून येत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना पुण्यात २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाणारा आहे. सामन्याच्या एक दिवस आधी गौतम गंभीरला प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न विचारण्यात आले. केएल राहुल किंवा सरफराज खान यापैकी कोणाला निवडणार? असं विचारताच गंभीरने म्हटलं की, सोशल मीडियावरील चर्चा महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचं हे आहे की संघ व्यवस्थापन आणि नेतृत्वाला काय वाटतं? केएल चांगली फलंदाजी करत आहे आणि नागपूरमध्ये कठीण खेळपट्टीवर चांगली खेळी केली होती.
गंभीर म्हणाला की, मला विश्वास आहे की त्याला माहितीय मोठी खेळी करावी लागणार आणि त्याच्यात तेवढी क्षमता आहे. त्यामुळेच संघ त्याला सपोर्ट करतो. पण शेवटी प्रत्येकाची कामगिरी कशी आहे, ते पाहिलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यातून कोणीही सुटणार नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सरफराजला शुभमन गिलच्या जागी संघात संधी देण्यात आली होती. गिल पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर होता. आता पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज आहे. गिलच्या पुनरागमनामुळे सरफराज खान किंवा दुसऱ्या एका खेळाडूला बाहेर बसावं लागणार आहे. सरफराजच्या दीडशतकामुळे आता केएल राहुलची जागा धोक्यात असल्याच बोललं जात आहे. पण भारतीय संघ केएल राहुलला सातत्याने सपोर्ट करत असल्यामुळे त्याच्यावर प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहे.