पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. अशातच आता मोटारीच्या धडकेत महापालिकेतील सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी मुंढवा-खराडी रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी ज्योती लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी मोटार चालकास अटक केली आहे.
छाया मंगेश पेढारकर (वय 39, रा. खराडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ (वय 52, रा. रायकर मळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार, मृत महिला छाया पेंढारकर या महापालिकेत कंत्राटी पदावर सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी छाया त्यांच्या सहकारी सह खराडीतील रस्त्यावर गवत काढण्याचे काम करत होत्या. त्या वेळी त्या रस्त्यावर भरधाव मोटारीने छाया यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या छाया यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोटार चालक धुमाळ याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख करत आहेत.