ICC Test Rankings : भारत- न्यूझीलंड कसोटी मालिका सुरु असताना आयसीसीकडून कसोटी रँकिंगची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये रिषभ पंतने मोठी झेप घेतली असून या यादीत रिषभ पंतने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत रिषभ पंतने ९९ धावांची शानदार खेळी केली होती. दरम्यान रिषभ पंत या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
कोण स्थान किती?
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. रुटने पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यातही चांगली कामगिरी केली आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानी घसरला आहे. तर यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानी कायम आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही फटका बसला असून तो श्रीलंकेच्या दुमिथ करुणारत्नेसह संयुक्तरित्या १५ व्या स्थानी आहे.
रचिनची मोठी उडी..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत रचिन रविंद्रची बॅट चांगली तळपली. त्याने भारतीय गोलंदाचांचा चांगलाच समाचार घेत शतकी खेळी साकारली होती. या खेळीचा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. या सामन्यापूर्वी रचिन ३६ व्या स्थानी होता. आता तो १८ व्या स्थानी पोहोचला आहे. तर शतकी खेळी करणारा डेवोन कॉन्व्हे ३६ व्या स्थानी पोहोचला आहे.
गोलंदाजांमध्ये बुमराह टॉप..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत गोलंदाजी करताना ८ गडी बाद करणाऱ्या मॅट हेनरीचाही चांगलाच फायदा झाला आहे. हेनरी गोलंदाजांच्या यादीत ९ व्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे.