मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश उमेदवार गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी धावपळ करतील, अशी चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गुरुवारीच ठाण्यातील कोपरी मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे उमेदवारांच्या हातात सहाच दिवस आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस पंचांगानुसार शुभ आहेत. काही उमेदवारांना विविध पक्षांनी एबी फॉर्म दिले असले, तरी अद्याप महाआघाडीचे जागावाटप आणि महायुतीच्या सर्व जागा जाहीर झालेल्या नाहीत.
यामुळे बंडखोरी, अर्ज माघारीचे नाट्य दिवाळीनंतरच रंगणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला चांगल्या मुहूर्ताची अथवा शुभ दिवसाची प्रतीक्षा असते. मुहूर्त, शुभ दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ असे सारे गणित तपासूनच अर्ज दाखल केले जातात. यंदाही गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त साधण्याची उमेदवारांची धडपड असणार आहे.
२९ ऑक्टोबरपर्यंत मुदत, सर्वच दिवस शुभ
गुरुवार, २४ ऑक्टोबरशिवाय २८ व २९ ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. २८ ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीचा प्रारंभ होत आहे, तर २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील, अशी शक्यता आहे.
माघारीची धावपळ
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी ३० ऑक्टोबरला होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. २ नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर तीन नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुट्टी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारी घेता येणार नाहीत. मात्र ४ नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघात अर्ज माघारीसाठी उमेदवारांची धावपळ सुरू होईल.