उरुळी कांचन, (पुणे) : मागील काही दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात मटका, जुगार, देशी -विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री, तसेच विनापरवाना लॉजही फार्मात आले आहेत. पूर्व हवेलीतील काही राजकीय नेते व पोलीस खात्यातील काही वरिष्ठांचा याला आशीर्वाद असल्याने उरुळी कांचनसह परिसरात जुगार अड्ड्यासह अवैध दारू विक्री, अवैध सावकारकी यासारख्या अवैध धंद्याचा अड्डा बनले आहे. शहर पोलिसांची तगडी यंत्रणा असतानाही अवैध धंद्यासह भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हे ग्रामीण पोलीस दलातून शहर पोलीस दलात समाविष्ठ होऊन दीड वर्ष होत आले आहे. परंतु अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायांवर कारवाई होऊन आळा बसेल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारु गाळण्यास विरोध करतो या कारणावरुन उरुळी कांचन हद्दीतील पांढरस्थळ परीसरात कांही समाजकंटकांनी एका नागरीकाला बेदम मारहान केली आहे. हे सगळे खुलेआम सुरु असताना ही लोणी काळभोर पोलीस नेमके करतात तरी काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठे ५ मटक्याचे तर दोन जुगाराचे अड्डे सुरु आहेत. नायगाव परिसरात एक मोठा मटक्याचा अड्डा असून लहान-मोठे हातभट्टी विक्रीची दुकाने आहेत. तसेच सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातहि मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, अवैध दारू, मटका, जुगारहि जोमात सुरु आहेत. अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
जुगार मटका खुले आम सुरु असतांना, दुसरीकडे मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा जामिनविषयक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप वाढलेला दिसून येत आहे. प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय केला जात आहे. उरुळी कांचन पोलीस चौकीत गेल्यानंतर, न्याय मिळेल असा विश्वास नसल्याने, उरुळी कांचन व परीसरातील नागरीक हवालदिल बनले आहेत.
मागील काही दिवसापासून कुंजीरवाडी, थेऊर, नायगाव, या परिसरातहि मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. सोरतापवाडी, शिंदवणे परिसरात हातभट्टीची मुबलक दारू बनवली जाते. हातभट्टीमध्ये रसायन मिसळून दारू काढली जाते. त्यामुळे पिणाऱ्याच्या जीवाला धोकाही होतो. इतर मद्यांच्या तुलनेत हि हातभट्टीची दारू कमी किमतीत मिळते. त्यामुळे कष्टमय व हलाकीचे जीवन जगणारे आर्थिक परिस्थितीमुळे गरीब असणारा समाज या हातभट्टीच्या आहारी गेला आहे. परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
दरम्यान, शहर पोलिसांच्या सामाजिक विभागाने तरडे परिसरात पेट्रोल, डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (बीपीसीएल) संशयित अधिकारी, कर्मचाऱ्यांसह १० ते १२ जनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई अनेक नामांकित व्यक्ती आढळून आल्या आहेत. मात्र, अशा पाच ते सहा टोळ्या येथील परिसरात सक्रिय आहेत. तथापि या छाप्याची चर्चा कमी झाली असली तरी या कारवाईनंतर मटका, जुगार, इंधन चोरी, अवैध सावकारकीसह, अवैध दारू विक्री पुन्हा सुरु झाली आहे.