नवी दिल्ली: भारताची माजी कुस्तीपटू साक्षी मलिकने तिच्या आत्मचरित्र विटनेसमध्ये अनेक मोठे खुलासे केले आहेत. सध्या ती तिच्या पुस्तकामुळे खूप चर्चेत आहे. या पुस्तकात तिने विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साक्षी मलिकसह विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या वर्षी डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते.
साक्षी मलिकने तिच्या पुस्तकात लिहिले आहे की, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या वर्षी आशियाई खेळांच्या चाचण्यांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधातील तिच्या प्रतिमेवर परिणाम झाला. कारण त्यामुळे मोहीम स्वार्थी दिसली. साक्षीच्या म्हणण्यानुसार, प्रदर्शनादरम्यान विनेश आणि बजरंगच्या आसपास उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे कान भरायला सुरुवात केली. त्यामुळे लोभाने त्यांच्यावर मात केली आणि दोघांनीही तदर्थ समितीचा निर्णय मान्य केला. आता या आरोपावर विनेश फोगटने मौन तोडत मोठं विधान केलं आहे.
स्टार कुस्तीपटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगट यांनी साक्षी मलिकच्या दाव्यांशी असहमती व्यक्त केली आहे. विनेशने पीटीआयला सांगितले की, ‘हे तिचे वैयक्तिक मत आहे. मला हे मान्य नाही. जोपर्यंत मी कमकुवत नाही, तोपर्यंत लढा कमकुवत होऊ शकत नाही. हा माझा विश्वास आहे. जोपर्यंत साक्षी, विनेश आणि बजरंग जिवंत आहेत, तोपर्यंत ही लढाई कमकुवत होऊ शकत नाही. विनेश पुढे म्हणाली, ‘ज्यांना जिंकायचे आहे, त्यांनी कधीही कमकुवत होऊ नये. त्यांनी मैदानावर नेहमी धैर्याने लढले पाहिजे. त्यासाठी कणखर होऊन आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे. आम्ही लढायला तयार आहोत.