पुणे : दिवाळी सण येताच लोकांच्या मनात उत्साह दिसतो. बरेचजण दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचे बेत आखतात. परंतु आता दिवाळीत फिरायला जाणे महाग होणार आहे. खासगी ट्रॅव्हल्स आणि विमान प्रवासाकरिता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ येत्या शुक्रवार 25 ऑक्टोबरपासून लागू होत आहेत, तर दुसरीकडे विमानांच्या तिकिटातही भरमसाठ वाढ झाली आहे.
सध्या दिवसाला मुंबईत येताना एक हजार आणि परतीच्या प्रवासासाठी एक हजार अशा एकूण दोन हजार ट्रॅव्हल्स धावतात. दिवाळीच्या सुट्टयांमध्ये ट्रॅव्हल्सची संख्या तीन हजारांवर पोहोचणार आहे. दरम्यान, राज्यात 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या दिवसात पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि आंतरराज्य मार्गावर गुजरात, राजस्थानला जाणा-या प्रवाशांची गर्दी आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गाचे वातानुकूलित स्लीपर बसचे नेहमीचे तिकीट 800 ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. दिवाळीत हेच तिकीट 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत झाले आहे. दिवाळीनिमित्त घराकडे निघालेले चाकरमाने, विद्यार्थी तसेच सुट्टीच्या काळात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना खिसा हलका करावा लागणार आहे.
विमान भाडे 30 ते 35 टक्क्यांनी वाढले
याबरोबरच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सणासाठी आगाऊ फ्लाइट बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी वाढलेली आहे. गोवा आणि जयपूरसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचे विमान भाडे सणासुदीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत.