पिंपरी चिंचवड : हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून एका व्यक्तीचा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. परंतु, पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास करत गंगा नदीच्या बेटावर डांबून ठेवलेल्या व्यक्तीची सुटका केली असून अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीची पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने सुखरूप सुटका केली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने गंगा नदीवरील गोलढाब बेटावर धाड टाकून पोलीसांनी अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. नसीम मणिरूल हक, लल्लू रुस्तम शेख आणि साजीम करीम बबलू शेख या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी हा फरार झाला आहे.
दरम्यान, अपहरण करणाऱ्या आरोपींनी आपल्या कल्याणी येथील एका मित्राच्या मदतीने अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाकडे मोबाईलवर एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास वडिलांना जीवे ठार मारून टाकण्याची धमकी सुद्धा आरोपींनी अपहरत व्यक्तीच्या मुलाला दिली होती. अपहरण केलेल्या व्यक्तीला पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या बॉर्डरवरून वाहणाऱ्या गंगा नदीच्या एका बेटावर डांबून ठेवण्यात आले होते.