पुणे : गाड्यांच्या जवळ शेकोटी करू नका म्हणल्याचा राग मनात धरून ६ अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका टपरी व्यावसायिकाचा लोखंडी पालघन, दगड व सिमेंटच्या ब्लॉकने खून केल्याची घटना खडकी येथे घडली आहे.
अरुणकुमार वैद्य वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाबाहेर शनिवारी (ता. २७) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आशिष रमेश कांबळे (वय ३५, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी प्रविण मधुकर गायकवाड (वय ४८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६ अल्पवयीन मुलांसह इतरांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कांबळे हे टपरी व्यावसायिक असून अरुणकुमार वसाहतीतील सुरती मोहल्ला येथे राहतात. त्यांच्या वस्तीत राहणार्यांशी त्यांचा यापूर्वी वाद झाला होता. शनिवारी काही मुले पार्क केलेल्या गाड्यांच्या जवळ शेकोटी पेटवत होते. त्यावेळी आशिष कांबळे यांनी त्यांना इथे शेकोटी पेटवू नका, गाड्यांना आग लागेल, असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान, मध्यरात्री आशिष हे शौचालयात जात असताना एका १४ वर्षाच्या मुलाने इतरांच्या मदतीने लोखंडी पालघन, दगड व सिमेंटच्या ब्लॉकने अशिषच्या डोक्यात मारले. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक सुडगे तपास करीत आहेत.