पुणे : दिवाळीनिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात आयोजित करण्यात आलेल्या पैठणी साड्यांच्या सेलमध्ये बालकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या पाळविणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी शनिवारी (दि. १९) अटक केली. गर्दीचा गैरफायदा घेऊन दागिने लांबवणाऱ्या या महिलांना दुकानातील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रेणुका अण्णा पवार (वय ३०, रा. शिवाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) व संगीता अंकुश सुकुळे (वय ४५, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) ही संशयित महिलांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध जारी केला आहे.
यासंदर्भात आंबेगाव बुद्रुकमधील एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकातील दुकानाजवळ शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. या दुकानात दीपावलीनिमित्त पैठणीचा सेल सुरू आहे. तेथे ग्राहकांची शनिवारी एकच झुंबड उडाली होती. त्या वेळी दुकानाजवळ उभ्या आलेल्या दोन महिलांच्या कडेवरील मुलांच्या गळ्यातील साखळ्या आरोपी महिलांनी लांबवल्या. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.