इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कळंब गावच्या हद्दीतील महिलांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या साड्या रस्त्यांवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हाला साड्या नको विकास हवा, अशी मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. मागील दोन आठवड्यापासून इंदापूर तालुक्यातील गावागावातील प्रत्येक घरात दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्र असणा-या पिशवीतील साड्यांचे वाटप करण्यात येत आहे.
मतदारांच्या घरात किती महिला मतदार आहेत याची व्यवस्थित यादी केली आहे. त्या महिलांच्या यादीनुसार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. वालचंदनगरच्या जवळ असणा-या कळंब गाव आणि तेथील परिसरातील वाड्या वस्त्यांवरही साड्या पोहोचवण्यात येत आहेत. मात्र, घोडकेवस्तीवरील महिलांनी या साड्या घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
महिलांना साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता. आणि विकास कुठं आहे, अशी विचारणा थेट कार्यकर्त्यांना या महिलांनी केली आहे. घोडकेवस्तीवर वीज, पाणी, रस्ते यांची अध्याप सुविधा नाही. घोडकेवस्तीवरुन पवारवस्तीकडे जाणा-या कच्च्या रस्त्यावरुन ये जा करणे खूप अवघड होते. सायकलवरुन ये जा करणा-या शाळकरी मुलांच्या सायकली रस्त्यावरून घसरतात.
वीज द्यावी यासाठी तीन चार वेळा सरपंचांना सांगितले,मात्र ते मागणीकडे काणाडोळा करत आहेत, अशा तक्रारी महिलांनी मांडल्या आहेत. तरुणांना नोक-या नाहीत या वस्तुस्थितीकडे ही लक्ष वेधले आहे. पासष्ट वर्षावरील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ का मिळत नाही. त्या सरकारच्या सावत्र बहिणी आहेत का? असा सवाल एका वयोवृद्ध महिलेने विचारला आहे. या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.