पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला बांबु व सिमेंटचा ब्लॉकने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना २० ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरामागे घडली आहे.
या प्रकरणी रोहित राजेंद्र गाडे (वय-३४, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेशन लावडे, प्रथमेश कचरे, श्रेयस कांबळे, शुभम (सर्व रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. गणेशन लावडे याच्याबरोबर फिर्यादी यांचे खूप दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून गणेशन हा हातामध्ये बांबु घेऊन आला. आरोपीचे तीन साथीदार हातामध्ये सिमेंटचे ब्लॉक घेऊन आले. त्यांनी फिर्यादी रोहित यांना शिवीगाळ केली.
दरम्यान, गणेशन म्हणाला या सगळ्यांना आज सोडायचे नाही संपवून टाकायचे आहे. असे म्हणून मारा यांना फिर्यादीच्या डोक्यात, नाकावर तसेच डोळ्यावर बांबु आणि सिंमेटच्या ब्लॉक मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.