मुंबई: समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दिल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळेस महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील आदी उपस्थित होते. कपिल पाटील विधानसभेसाठी गोरेगावसह वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.
माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी गेल्या वर्षी नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर जनता दलातून बाजूला होत समाजवादी विचारांच्या लोकांना सोबत घेत समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. कपिल पाटील हे विधानसभेसाठी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. यासंदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे चाचपणी केली होती. मात्र, ठाकरेंनी नकार कळवला.
त्यामुळे मधल्या काळात कपिल पाटील यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करत वेगळ्या पर्यायाची चाचपणी सुरू केली होती. अखेर कपिल पाटील यांना काँग्रेसने गोरेगाव किंवा वर्सोवा मतदारसंघातून उमेदवारीचा शब्द दिल्याचे कळते. गोरेगाव मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे, तेथे गेली १० वर्षे भाजपच्या विद्या ठाकूर आमदार आहेत. तेथे ठाकरे गटाकडून समीर देसाई इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील काँग्रेसकडून वर्सोव्याचे उमेदवार असतील, अशी माहिती आहे.