पुणे : पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी सणानिमित्त दिवाळी फराळ, साबण, उटणे याचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री उशीरा रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांना आपल्या वाजूनं वळवण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत आहेत.
आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीने मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत होते. यानंतर भाजपने ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याची माहिती पुण्याचे भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापुरकर यांनी दिली. सध्या आचारसंहिता सुरु आहे. त्याच आचारसंहितेचा भंग होत असल्याचे विद्यमान आमदारांना समजत नाही का? असा प्रश्नही तुळजापुरकर यांनी यावेळी केला आहे. आचारसंहिता सुरु असताना तुम्ही बिनधास्त दिवाळी फराळ वाटत आहेत. तुम्ही पडणार आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे.
रविंद्र धंगेकरांकडून मतदारांना वाटप करण्यासाठी निघालेल्या दिवाळी फराळाचा टेम्पो भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवला. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.